स्वातंत्र्य दिन भाषण मराठी : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. ते देशभरामध्ये आनंदाने साजरे केले जातात. या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांना करता येतील अशी स्वातंत्र्य दिन भाषणे मराठी मध्ये पाहणार आहोत.
स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 1
उत्सव हा स्वातंत्र्याचा, साऱ्या जगात गाजतो
प्रत्येक भारतीयांच्या मना मनात अभिमान जागवतो.
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे; ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे.
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. अनेक वर्षे आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केले. त्यांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश या दिवशी स्वतंत्र झाला. म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, काहींनी तुरुंगवास भोगला. अशा या शूर स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण करण्याचा हा दिवस. आपण आज आनंदाने, सुखाने ज्या स्वातंत्र्यांमध्ये जगत आहोत ते या शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळेच. म्हणून आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे आणि आपला देश अधिक समृद्ध बनवण्यामध्ये आपले योगदान दिले पाहिजे.
आजच्या या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना माझे अभिवादन! एवढे बोलून मी माझे चार शब्द संपतो.
जय हिंद! जय भारत!
स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2
सर्वांना नमस्कार, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत, अशी माझी नम्र विनंती आहे.
सर्वात प्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आज हा स्वातंत्र्य दिन ज्यांच्यामुळे पाहू शकतो त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना त्रिवार अभिवादन! स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभरामध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. हा आपला राष्ट्रीय सण म्हणून सर्वजण आनंदाने साजरा करतात.
सर्वात प्रथम शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय व इतर कार्यालये अशा सर्वच ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. तिरंगी ध्वज फडकवून राष्ट्रगीत गायले जाते. शाळेतील विद्यार्थी व सर्वच लोक स्वच्छ कपडे घालून शिस्तबद्ध पद्धतीने या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.
भारतावर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यसेनानींनी प्रयत्न केले त्या सर्वांविषयी आदर व अभिमान व्यक्त केला जातो. त्यांच्याविषयीच्या आठवणी जागृत केल्या जातात. भारतातील प्रत्येक नागरिकाला इंग्रजांच्या गुलामगिरीमुळे भारतीयांनी सहन केलेले चटके यांची जाणीव करून दिले जाते.
कारण पुन्हा कधीही कुणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये. प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत होऊन देशासाठी बलिदान देण्यासही प्रत्येकाने तयार असले पाहिजे. अशा प्रकारची नवऊर्जा या दिवसाने प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते. अशा या पवित्र दिनानिमित्त आपणा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा! एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
भारत माता की जय! वंदे मातरम् !
स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 3
उत्सव हा स्वातंत्र्याचा, साऱ्या जगात गाजतो
प्रत्येक भारतीयांच्या मना मनात अभिमान जागवतो.
नमस्कार, माझे नाव ……….. मी इयत्ता ….मध्ये शिकत आहे.
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला स्वातंत्र्यदिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे; ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे.
आज 15 ऑगस्ट, आपल्या देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान मोठे उठाव झाले. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, वि. दा.सावरकर व लाला लजपत राय यासारख्या क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान दिले.
आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य आबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून देशाच्या विकासास हातभार लावला पाहिजे. क्रांतिकारकांच्या कार्यापासून प्रेरित होऊन देशाच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने या क्रांतिकारकांना आपले अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय भारत!
Pingback: Independence Day Speech 2024 | स्वातंत्र्य दिन भाषण हिंदी - अभ्यास माझा