पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये झाला. त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर या जिल्ह्यात जामखेड नावाचा एक तालुका आहे या तालुक्यामध्ये चौंडी या गावांमध्ये झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे असे होते व आईचे नाव सुशीलाबाई शिंदे होते. माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते. त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती. मुलींना लिहायला वाचायला शिकवले जात नव्हते. अशा काळामध्ये अहिल्याबाई होळकर याच्या वडिलांनी अहल्यादेवींना लिहायला व वाचायला शिकवले.
अहिल्याबाई होळकर यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाला. खंडेराव होळकर हे मल्हारराव होळकर यांचे पुत्र होते. अहिल्यादेवी होळकरांचे पती खंडेराव कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्या काळामध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीला सती जावे लागत होते. म्हणजेच ज्या चितेवर पतीचे अंतिम संस्कार केले जात असत; त्या चितेवर त्याच्या पत्नीला जिवंतपणे उडी घ्यावी लागत होते. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मात्र मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही.
पुढे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी होळकर माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करत होत्या.. अहिल्यादेवी होळकर या उचित न्याय देण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या राज्यामध्ये लोकांना उत्तम प्रकारे न्याय मिळत होता. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्याचबरोबर काही मंदिरे नव्याने बांधली. माळवा प्रांता बरोबरच माळवा प्रांताबाहेर ही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
स्वातंत्र्य पूर्व काळात महाराष्ट्रात अनेक वीरांगना होऊन गेल्या त्यात अहिल्याबाई होळकर या अग्रगणी होत्या. सैन्य तुकडीमध्ये त्यांनी पुरुषाप्रमाणेच स्त्रियांनाही संधी दिली. त्यांनी शेतकऱ्यांची जाचक करातून मुक्तता केली.अनेक ठिकाणी तलाव विहारी बांधल्या.
अशाप्रकारे अहिल्याबाई होळकर या उत्तम शासक व संघटक होत्या. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी खूप काम केले. त्यांचा कार्यकाळ सुमारे ३० वर्षांचा होता.त्यांचे राज्य हे कायद्याचे आणि न्यायचे होते. आपल्या असामान्य कार्याने त्यांनी सर्व जनतेचे मन जिंकले. वयाच्या ७० व्या वर्षी म्हणजेच १३ ऑगस्ट १७९५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशा या महान विरांगानेस माझे अभिवादन!