महात्मा जोतिराव फुले भाषण : म. फुले यांच्या जीवनाचा परिचय करून देणारी छोटी छोटी भाषणे येथे आपण पाहणार आहोत.
महात्मा जोतिराव फुले भाषण १
नमस्कार, अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या समाजसुधारकाबद्दल चार शब्द सांगणार आहे. ज्यानी आपल्या जीवनात समाजसुधारणा, शिक्षण, सामाजिक विषमता, शेतकऱ्यांचे प्रश्न व स्त्रीहक्कासाठी अपार संघर्ष केला आणि त्या संघर्षामुळे आज आपण त्यांचे नाव आदराने घेतो, ज्यांचा जीवनकार्य आजही प्रेरणा देणारे आहे – ते महात्मा म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले.
म. जोतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते. म. फुले यांनी आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि ते त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश बनवले. ते एक थोर समाजसुधारक होते, जे त्यांच्या काळातील जातिवाद, रूढी, प्रथा व स्त्री शिक्षणाच्या अभावाविरुद्ध लढले. यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी भक्कम साथ दिली.
महात्मा फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ या संघटनेची स्थापना केली. या समाजाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील असमानतेला, अत्याचारांना आणि अज्ञानाला विरोध करणे. ‘सत्यशोधक समाज’ या संघटनेत फुले यांनी जातिवाद, लिंगभेद, धर्मभेद यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या असमानतेविरुद्ध आवाज उठवला. फुले यांनी महिलांमध्ये शिक्षण आणि समानतेची भावना जागवली.
ज्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी न्याय, समानता आणि शिक्षणासाठी प्रयत्न केला. आशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम!
महात्मा जोतिराव फुले भाषण २
नमस्कार, अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला क्रांतिसूर्य म. फुलेंच्या शैक्षणिक कार्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावेत अशी माझी नम्र विनंती…
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेचे इतके यतार्थ वर्णन ज्यांनी केले, सर्व सामान्य, शेतकरी, मागास समाज व मुलींच्या शिक्षणासाठी ज्यानी आपले आयुष्य समर्पित केले असे महान समाजसुधारक, शिक्षण तज्ञ, विचारवंत, लेखक, शिक्षक, क्रांतिसूर्य म. जोतिराव फुले यांना त्रिवार वंदन.
म. फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यापूर्वी मुलींसाठी शिक्षणाची सोय नव्हती. मुलीना शिकवणे म्हणजे घोर पाप मानले जात होते. अशा काळात त्यांनी शाळा सुरु करून आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली.
पुण्यामध्ये मुलींच्या साठी पहिली शाळा सुरू झाली खरी पण शाळेत मुलींना शाळेत पाठवायला कोणीही तयार नव्हतं. अथक प्रयत्नानंतर महात्मा फुले यांनी आपल्या काही मित्रांच्या मुली शिक्षणासाठी शाळेत आणल्या. हळूहळू मुलींचे शिक्षण सुरू झाले त्याबरोबरच मुलींची संख्याही वाढू लागली.
मुलीना शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला अगोदर शिकवले व त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी म. फुलेंच्या खांद्याला खांदा लाऊन त्याच्या या कार्यात आयुष्यभर साथ दिली.
त्या काळात हे काम सोपे नव्हते सनातन्यांचा मुलींच्या शिक्षणाला कडाडून विरोध होता. लोक क्रांतीज्योती सावित्रीबाईना जाता येता खूप त्रास देत होते. त्यांच्या अंगावर शेणगोळे, चिखलफेक करत होते त्याचबरोबर त्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीही देत होते. पण दोघेही न डगमगता या विरोधा ठामपणे विरुध्द उभे राहिले.
त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये हळूहळू अनेक शाळा सुरु केल्या. मुलीबरोबर अस्पृश्यांसाठीही त्यांनी शाळा सुरु केल्या. आशा या महान नेत्यास शतशः नमन करून मी माझे भाषण संपवितो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!