विषय – परिसर अभ्यास : भाग २ इतिहास म्हणजे काय
इयत्ता – पाचवी
इतिहास म्हणजे काय या घटकामध्ये इतिहासाविषयी मुलभूत माहिती दिली आहे. ऐतिहासिक पुराव्यामध्ये समाविष्ठ बाबी सांगितल्या आहेत.
प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
१) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ‘ इतिहास ‘ म्हणतात.
( पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास )
२) इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही.
( कल्पनेच्या, इच्छेच्या, प्रेरणेच्या )
प्र २) पुढीलपैकी इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा.
इतिहासाची साधने : नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, ताम्रपट, शिलालेख, वाडे, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लोककथा, लेणी, हत्यारे, हस्तलिखिते, राजमुद्रा, हाडे.
उत्तर :
१) भौतिक ( पुरातत्वीय साधने ) – नाणी, किल्ले, ताम्रपट, भांडी, वाडे, लेणी, शिलालेख, हत्यारे,स्तंभ, राजमुद्रा, हाडे यांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो.
२) लिखित साधने – पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ, हस्तलिखिते, ताम्रपट
३) मौखिक साधने – जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा.
प्र ३) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) ‘ शास्त्रीय पद्धत ‘ म्हणजे काय ?
प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही, हे ठरवण्याच्या पद्धतीला ‘ शास्त्रीय पद्धत ‘ असे म्हणतात.
२) इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते ?
इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय, यांचा अभ्यास करणे शक्य होते.
३) स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे ?
स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे.
४) गावाच्या विकासात अडथळे केव्हा निर्माण होतात ?
गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही; तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात.
प्र ४) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) ‘ इतिहास हे शास्त्र आहे,’ असे का म्हटले आहे ?
इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले; तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांची ही मदत घेतली जाते; म्हणूनच ‘ इतिहास हे शास्त्र आहे,’ असे म्हटले जाते.
२) इतिहासासाची मांडणी करण्याची शास्त्रीय पद्धत कोणती ?
भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले, याचा शोध भौतिक, लिखित आणि मौखिक साधनाद्वारे घेतला जातो. या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुरव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही इतिहास मांडणीची शास्त्रीय पद्धत आहे.
३) ‘ भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो,’ हे विधान स्पष्ट करा.
आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. पूर्वीच्या माणसाने हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र विकसित केले, चाकाचा शोध लावला. या तंत्रात भर घालून पुढील पिढीने आपल्या शारीरिक आणि बौद्धिक सामर्थ्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच नवनवीन शोध लावणे मानवाला शक्य झाले. यावरून हे सिद्ध होते, की भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो.