इयत्ता ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील चवदार तळ्याचे पाणी ही कविता कवयित्री अनुराधा साळवेकर यांनी लिहिलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 ला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहावर आधारित चवदार तळ्याचे पाणी ही कविता आहे.
चवदार तळ्याचा सत्याग्रह
देशात त्यावेळी सर्वत्र अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास मनाई होती. ज्या पाण्याचा आस्वाद हिंडणारी गुरे, कुत्रे व इतर प्राणी घेऊ शकत होते तेच पाणी येथील अस्पृश्यांना पिण्यासाठी मनाई होती. त्या पाण्याला स्पर्श केला तरी त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केला जात असे. मानवते विरुद्ध असलेली ही परंपरा मोडून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. चवदार तळे हे रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी आहे.
चवदार तळ्याचे पाणी पिऊन कोणी अमर होणार नाही मात्र माणूस म्हणून माणसाचे हक्क, समतेचा हक्क मिळवण्यासाठीचा हा लढा होता. या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने अस्पृश्यांमध्ये एक नवी चेतना निर्माण केली. चवदार तळ्याप्रमाणेच देशातील सर्वच ठिकाणी ही परिस्थिती होती. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला होता. या सत्याग्रहाने घडलेला बदल अस्पृश्यांमधील व सर्वच गरिबांमध्ये झालेला बदल कवयित्रीने या कवितेमध्ये मांडलेला आहे.
चवदार तळ्याचे पाणी स्वाध्याय
- एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली?
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने सर्व मानवांना नवीन शक्ती दिली.
आ) चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कोणाची स्फूर्ती आहे?
उत्तर-चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती आहे.
इ) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले?
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले.
प्र. 2) थोडक्यात उत्तरे लिहा.
- ‘अन्यायासाठी लढूनी’ असे कवयित्री का म्हणते?
रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिण्यास मनाई होती. जे पाणी हिंडणारी गुरे, कुत्रे व इतर प्राणी पिऊ शकत होते तेच पाणी अस्पृश्यांना पिण्यासाठी मनाई होती. हा मानवतेचा घोर अपमान होता. आपला हक्क मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या अन्यायाविरुद्ध लढा उभारला. म्हणून ‘अन्यायासाठी लढूनी’ असे कवयित्री म्हणतात.
2.आत्मभान कशामुळे जागे होते?
सर्व सामान्य माणसात स्वाभिमान, स्व ची जाणीव निर्माण करणे म्हणजे त्याच्यात आत्मभान जागे करणे होय. आपल्यावर होणाऱ्या अन्यायची जाणीव निर्माण करून दिली कि त्याविषयी लढण्याची प्रेरणा निर्माण होते. अशाप्रकारे स्वाभिमान जागृत झाल्यावर, अन्यायाची जाणीव झाल्यावर व समतेची भावना निर्माण झाल्यावर आत्मभान जागे होते.
प्र. 3) रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
(नाकारायचे, स्वीकारायचे, लढायचे, प्रेरित करायचे, जागे करायचे )
- दिनांना- प्रेरित करायचे
- मानवतेला – जागे करायचे
- अन्यायाविरुद्ध- लढायचे
- परंपरेला- नाकारायचे
- आत्मभान- जागे करायचे.
प्र. 4) योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
१) भीमकाय | उत्तर- स्फूर्ती |
२) मुक्यास | उत्तर- वाणी |
३) दीनांना | उत्तर- प्रेरणा |
४) अन्यायविरोधी | उत्तर- लढा |
५) परंपरेला | उत्तर- नकार |
प्र. 5) समानार्थी शब्द लिहा.
- पाणी – जल
- वाणी –
- शक्ती – ताकद
- दीन – गरीब
प्र. ६) खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
- स्फूर्ती- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनांना स्फूर्ती दिली.
- दीन- म. ज्योतीराव फुले यांनी दीन– दुबळ्या लोकांच्या व मुलींच्या शिक्षणसाठी आयुष्य भर कार्य केले.
- मानवता– माणसामधील मानवता जागृत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.
- शक्ती– जीवनामध्ये बऱ्याचदा शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते.
- दिन– पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात.
प्र. 7) खालील शब्दांना ‘ता’ प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा.
जसे मानव- मानवता
- सुंदर- सुंदरता
- मधुर- मधुरता
- नादमय- नादमयता