आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. एकादशी हा दिवस वारकरी संप्रदायामध्ये खूप पवित्र मानल जातो . वर्षामध्ये सर्वसाधारणपणे 24 एकादशी येतात. दरमहा सर्वसाधारणपणे दोन एकादशी एक शुक्ल पक्षामध्ये व एक कृष्ण पक्षांमध्ये येते. या सर्व एकादशीमध्ये आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या या आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र मध्ये संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अनेक संत होऊन गेले. संतांनी महाराष्ट्रामध्ये समता स्थापन करण्याचे खूप महत्त्वाचे कार्य केले. वारकरी संप्रदायामध्ये वारीला जाताना कोणताही भेदभाव पाळला जात नाही. सर्व वारकरी हे वारकरी असतात त्यामध्ये कोणीही लहान अथवा मोठा नसतो. सर्वजण स्वतःची कामे स्वतः करून विठ्ठल भक्तीत लीन होतात.
महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भक्त आषाढी एकादशीला जमा होतात. यामध्ये अनेक भक्त पायी येणाऱ्या दिंडीतून पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वर होऊन संत निवृत्तीनाथ यांची तर देहू वरून तुकाराम महाराजांची व पैठण होऊन एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जाते. या पालख्यांबरोबर अनेक वारकरी, विठ्ठल भक्त पायी विठू नामाचा गजर करत निघतात.
आषाढी एकादशीच्या अगोदर जवळपास 15 दिवस ते महिनाभर या पालख्या निघतात. या प्रवासामध्ये वारकऱ्यांना अध्यात्मिक समाधान मिळते. त्यांना वाटेत येणाऱ्या संकटांची, कष्टाची, त्रासाची परवा नसते. वारीमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला माऊली म्हणून हाक मारली जाते. लहान मोठा असा कोणताही भेदभाव न करता एकमेकाला नमस्कार केला जातो. प्रवासात सर्वत्र सहभाजन केले जाते.
सर्व पालख्या शेवटी पंढरपुरामध्ये दाखल होतात. तिथे रांगेने विठोबाचे दर्शन घेतले जाते. विठोबाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन भजन, कीर्तन, अभंग म्हटले जातात. आषाढी एकादशी दिवशी सर्व वारकरी उपवास करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत असतो. या कालावधीमध्ये विठोबाचे दर्शन घेणे वारकऱ्यांसाठी भाग्याचे वाटते.
पंढरपूरमध्ये गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून आपल्या हातून घडलेल्या वाईट गोष्टी विसरून पुढील काळात आपल्या हातून कोणतीही वाईट गोष्ट घडू नये असा संकल्प केला जातो. चंद्रभागेतील स्नान हे पंढरपुरातील एक महत्त्वाचे धार्मिक कार्य आहे. विठोबाच्या दर्शनाने एक नवी ऊर्जा घेऊन सर्व वारकरी आपापल्या घरी परततात. आणि आपल्या कामाला नवीन जोमाने सुरुवात करतात.
आषाढी एकादशीच्या वारीला धार्मिक अनन्य साधारण महत्व आहेच. पण त्याचबरोबर सामाजिक दृष्टीनेही या वारीचे महत्त्व खूप आहे. सामाजिक समतेची शिकवण देणारी ही वारी समाजातील गरीब श्रीमंत, उच्च- नीच, स्त्री-पुरुष असे सर्वच भेदभाव विसरून जाते. जीवनाचा आनंद लुटत वारकरी विठोबाशी एकरूप होऊन एकमेकाचा आदर सन्मान करत पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. समाजामध्ये प्रेम आपुलकी विश्वास आदर निर्माण करण्याचे काम या वारीमध्ये केले जाते.
ज्या लोकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते लोक ही आपआपल्या गावामध्ये उत्साहाने दिंडी काढून ह्या वारीचा आनंद घेतात. शाळेमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ यांच्या सहाय्याने दिंडीचे आयोजन केले जाते. लहान वारकरी आनंदाने टाळ वाजवत या वारीमध्ये सहभागी होतात. विद्यार्थी विद्यार्थिनी वारकऱ्यांचे पोशाख घालून दिंडीमध्ये सहभागी होतात. अशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लहान-मोठ्या दिंड्या आषाढी एकादशी दिवशी काढल्या जातात.
आषाढी एकादशी बरोबरच कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी वारकऱ्यांच्या दृष्टीने पवित्र मानली जाते. ज्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेता येत नाही. असे वारकरी कार्तिक वारी मध्ये जाऊन पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेतात. काही वारकरी दोन्ही वाऱ्यांना पंढरपूरला जातात.
अशाप्रकारे महाराष्ट्र मधील पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला जाणारे लाखो वारकरी यांना एक नवीन ऊर्जा देण्याचे काम या वारीतून होते.