समतेचा लढा स्वाध्याय : आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य लढा महत्त्वाचा होता. हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींना ही विरोध होऊ लागला.
स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्वाचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित आदी समाज घटकांनी भरलेल्या चळवळ आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. अशा या लढ्याची माहिती समतेचा लढा या पाठात पाहावयास मिळते.
समतेचा लढा स्वाध्याय
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
( लाला लजपतराय, साने गुरुजी, रखमाबाई जनार्दन सावे )
१) राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दन सावे यांनी केली.
२) अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी हे होते.
३) आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते.
2. समतेचा लढा पाठावर आधारित टिपा लिहा.
१) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे एक थोर समाजसेवक होते. समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी व दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ मध्ये डिस्प्रेड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता; तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूती नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग होता.
त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा, उद्योग शाळा काढल्या. त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकरी परिषद, संयुक्त मतदार संघ योजना इत्यादींबाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते विविध कार्यांमध्ये सक्रियपणे भाग घेत होते.
२) राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा
राजश्री शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राम्हणेतर चळवळीचे नेतृत्व केले. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसाय बंदी असे तीन निर्बंध जातिव्यवस्थेत होते. या संदर्भात सभा, परिषदांमध्ये दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, अशी शाहू महाराजांची धारणा होती .
त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.२२ फेब्रुवारी १९१८ रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील ‘बलुतेदारी पद्धती ‘ नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता केली.
अशाप्रकारे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आणि या देशांमध्ये समता मुलक समाजाची पायाभरणी केली.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले.
१९२५ साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. तरुणांनी सरकार विरुद्ध शेतकरी व कामगार यांना एकजूट केले. सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला. म्हणून सरकारने चळवळ चिरडण्याचे ठरवले.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक चळवळीत वृत्तपत्रांना अनन्य साधारण महत्त्व दिले होते. वृत्तपत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ मूकनायक ‘, ‘ बहिष्कृत भारत ‘ , ‘ जनता ‘ , ‘समता ‘अशी वृत्तपत्रे सुरु केली.
३) राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.
आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले.१८९९ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली, तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.
वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यात उपयोग
४. समतेचा लढा पाठावर आधारित पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो ?
आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता. हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींना विरोध होऊ लागला.
स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाजघटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही.
२) पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा.
१९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा घेतल्या, मिरवणुका काढल्या. कलेक्टर कचेरी वर मोर्चा काढले.१९४२ च्या क्रांतीपर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले.
साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. धुळे- अंमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे, यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले.
३) कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले ?
कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले.१९२८ साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने सहा महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताग कामगार इत्यादींनी केले.
कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले.
४) स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे; परंतु आधुनिक युगात या विरुद्ध जागृती होऊ लागली.
स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटना ही स्थापन होऊ लागल्या. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या ‘ आर्य महिला समाज ‘ व ‘ शारदासदन ‘ या संस्था, तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवासदन संस्था ही त्याची उदाहरणे आहेत.
‘भारतीय महिला परिषद ‘(१९०४ ) , ‘ ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स ‘ ( १९४७ ) या संस्थांचीही स्थापना झाली. त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळी पर्यंत जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या.
रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली. विसाव्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता.१९३५ च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्येही स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री -पुरूष समतेचे तत्त्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले.