संविधान दिवस माहिती : संविधान दिवस हा 26 नोव्हेबर रोजी भारतात सर्वत्र साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने आपले संविधान स्वीकारले. मात्र देशात प्रत्यक्षात ते २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आले. या पोस्टमध्ये संविधान दिवसाची माहिती पाहणार आहोत.
संविधान दिवस कधी साजरा केला जातो?
भारतात संविधान दिवस दरवर्षी २६ नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. लोकामध्ये संविधानाबद्दल, आपले हक्क व कर्तव्याबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहाने सर्व शाळा, महविद्यालय शासकीय कार्यालये साजरा केला जातो. संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले जाते.
संविधान दिवस माहिती : संविधान दिवस का साजरा करतात?
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी संविधान समिती स्थापन करण्यात आली. या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉ. राजेंद्र प्रसाद. उपाध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी व वी.टी. कृष्णमचारी, अस्थायी अध्यक्ष- सच्चिदानंद सिन्हा तर घटनात्मक कायदेशीर सल्लागार- बी.एन. राव होते. त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जे.बी. कृपलानी, मौलाना अबुल कलाम आझाद इत्यादी नेते या संविधान सभेत होते.
संविधान सभेत आठ प्रमुख समित्या होत्या. संविधान सभेमध्ये मसुदा समिती ही एक महत्त्वाची समिती होती. संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम या समितीचे होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीतील इतर सदस्यांनी मिळून संविधानाचा मसुदा तयार करण्यास सुरुवात केली. संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात.
संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास केला. सर्व देशातील घटनांच्या चांगल्या गोष्टी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केल्या. भारतीय राज्यघटना ही देशातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. भारतीय संविधान पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला होता. संविधानात ३९५ कलमे, ८ अनुसूची, २२ भाग समाविष्ट करण्यात आले होते. मसुदा समितीने मसुदा तयार केल्यानंतर त्यातील प्रत्येक घटकावर सविस्तर चर्चा संविधान सभेमध्ये झाली. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हे संविधान तयार करण्यात आले.
संविधान तयार झाल्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व इतर मान्यवरांकडे ती सुपूर्त करण्यात आली. संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणूनच संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये शेवटच्या ओळीत “आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करत आहोत “ अशा प्रकारचे वाक्य आहे.
संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला असला तरी प्रत्यक्षात संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. आपण 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला?
भारतीय संविधान पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला होता. इतक्या दीर्घ चर्चेनंतर, अभ्यासानंतर आपले संविधान तयार करण्यात आले.आहे.
संविधान दिवस कसा साजरा केला जातो?
या वर्षी संविधान दिवस मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. संविधान दिवशी शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयात निरनिराळे कार्यक्रम साजरे केले जातात. संविधान प्रास्ताविक वाचन केले जाते. संविधानविषयक जनजागृती केली जाते. मान्यवराचे भाषण आयोजन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. याच बरोबर निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.