इयत्ता नववीच्या इतिहास व राज्यशास्त्र विषयाचा उद्योग व व्यापार स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत.
उद्योग व व्यापार स्वाध्याय
प्र 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
- 1948 मध्ये …… या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.
अ ) औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा.
ब ) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.
क ) रोजगार निर्मिती व्हावी.
ड ) तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी.
उत्तर – 1948 मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.
2 ) भारतातील ……. उद्योगाला ‘ सनराईज क्षेत्र ‘ म्हटले जाते.
अ ) ताग
ब ) वाहन
क ) सिमेंट
ड ) खादी व ग्रामोद्योग
उत्तर – भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते.
3 ) वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम …… हे आहे.
अ ) कापड उत्पादन करणे.
ब ) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.
क ) कापड निर्यात करणे.
ड ) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
उत्तर – वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे.
4 ) सायकल उत्पादनात …… हे भारतातील प्रमुख शहर आहे.
अ ) मुंबई
ब ) लुधियाना
क ) कोची
ड ) कोलकता
उत्तर – सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे.
ब ) पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
- भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ – औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.
2. औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे.
3.वस्त्रोद्योग समिती – विणकारांचे कल्याण करणे.
4. खादी व ग्रामोद्योग आयोग – ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे.
उत्तर – वस्त्रोद्योग समिती – विणकारांचे कल्याण करणे.
प्र 2 ) अ ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा.
चौकट पूर्ण करा.
1) भारतात आयात होणाऱ्या वस्तू – भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड ,खनिज, तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
2) भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू – भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
ब ) टिपा लिहा.
1 ) भारताची आयात – निर्यात
आयात करणे म्हणजे दुसऱ्या देशातून माल आपल्या देशात आणणे होय. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री ,लोखंड ,खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
निर्यात करणे म्हणजे आपल्या देशातील माल इतर देशात पाठवणे होय. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी ,मसाल्याचे पदार्थ ,सुती कापड ,चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
2) भारताचा अंतर्गत व्यापार
भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. मुंबई, कोलकत्ता, कोची, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग,लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो.
3) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
१) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थना स्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यामुळे देश – परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.
२)पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई – सुविधा केल्या जातात.
३) पर्यटनाच्या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातून रोजगार उपलब्ध होतो. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
2) भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.
१) भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. त्यामुळे भारताच्या विकासास खूप फायदा झाला.
२) भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. मुंबई, कोलकत्ता, कोची, चेन्नई ही बंदरे महत्वाची आहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू , कच्चा ताग, लोखंड, पोलाद , तेलबिया,मीठ ,साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
३) देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. देशाच्या प्रगतीतुनच देशातील लोकांची प्रगती होते व राहणीमानाचा दर्जा सुधारतो.
4) पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
- शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
उत्तर – १) भारतात ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवर आधारित इतर अनेक व्यवसाय आहेत. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात.
२) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.
३) पंचायत समितीमार्फत शेती विषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो.
४) कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळी शेळीपालन, गाई – म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचे प्रशिक्षण दिले जाते.
५) जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम ( वेअर हाऊस) बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
2) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
उत्तर – पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोई – सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात .काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी तेथे स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातून पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार निर्माण होतो.
3) भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात ?
उत्तर – वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवले आहेत. बांधकाम ,कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चामाल यावर आधारित उद्योग वनसंपत्ती वर चालतात.