Skip to content

मराठी म्हणी आणि अर्थ | 150 Mhani v tyanche arth

  • by
मराठी म्हणी आणि अर्थ

मराठी भाषेचा अभ्यास करताना मराठी म्हणी आणि अर्थ ( Mhani v tyanche arth ) माहीत असणे आवश्यक आहे. वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द यासारख्या बाबी मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. यामधील अनेक मराठी म्हणी आणि अर्थ आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये नेहमी वापरल्या जातात.

मराठी म्हणी आणि अर्थ

  • अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारकच ठरतो.
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा– जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, पण प्रत्यक्षात त्याच्या हातून कोणतेही काम होत नसते.
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी– शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
  • असतील शिते तर जमतील भूते– आपला भरभराटीचा काळ असला, तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात.
  • आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी- जेथे मदतीची गरज आहे, तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे.
  • आगीतून फुफाट्यात– लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.
  • आधी पोटोबा मग विठोबा– आधी स्वतःच्या पोटाचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे.
  • आवळा देऊन कोहळा काढणे– क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा फायदा करून घेणे.
  • आयत्या बिळात नागोबा– दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे.
  • आलीया भोगासी असावे सादर– जे नशिबात असेल, ते भोगायला तयार असावे.
  • आपला हात जगन्नाथ– आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट योग्य ठरते.
  • आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार – जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय.
  • आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे- अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे.
  • इकडे आड, तिकडे विहीर- दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.
  • उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग- उतावळेपणाने मुर्खासारखे वर्तन करणे.
  • उचलली जीभ लावली टाळ्याला- विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार- ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात, तो माणूस फार बढाई मारतो.
  • ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये- एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये.
  • एक ना धड, भाराभर चिंध्या- एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.
  • एका हाताने टाळी वाजत नाही- कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
  • ऐकावे जनाचे, करावे मनाचे- कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे.
  • कर नाही त्याला डर कशाला ? – ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगायचे कारण नाही.
  • करावे तसे भरावे- दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.
  • कामापुरता मामा- गरजेपुरते गोड बोलणारा माणूस.
  • काखेत कळसा गावाला वळसा- हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे.

मराठी म्हणी आणि अर्थ

  • काळ आला होता, पण वेळ आली नव्हती- एखादे घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे.
  • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ- स्वार्थासाठी किंवा केवळ दुष्ट बुद्धीने, शत्रूला मदत करून आपल्याच माणसांचे नुकसान करणे.
  • कोळसा उगाळावा तितका काळाच- वाईट गोष्टी बाबत जितकी चर्चा करावी, तितकी ते अधिकच वाईट ठरते.
  • काप गेले नि भोके राहिली- वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या.
  • कोल्हा काकडीला राजी- शूद्र माणसे शूद्र गोष्टींनी ही खुश होतात.
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही- शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
  • कुडी तशी पुडी- देहाप्रमाणे आहार किंवा कुवती नुसार मिळणे.
  • खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी-अशी अतिशय दुराग्रहाची किंवा हटवादीपणाची वागणे. तडजोड मुळीच न करणे.
  • खायला कार भुईला भार- निरोपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
  • खाण तशी माती- आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
  • खाई त्याला खवखवे- जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
  • खोट्याच्या कपाळी गोटा- खोटेपणा , वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते.
  • गुरुची विद्या गुरुला- एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
  • गाढवाला गुळाची चव काय ?- ज्याला एखाद्या गोष्टीचा ज्ञान नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
  • गोगलगाय अन् पोटात पाय- बाहेरून गरीब दिसणारी; पण मनात कपट असणारी व्यक्ती.
  • गरज सरो, वैद्य मरो- एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपली की त्याला ओळखही न दाखवणे.
  • गर्जेल तो पडेल काय- केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही.
  • गाड्या बरोबर नळ्याची यात्रा- मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.
  • गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता- मूर्खाला कितीही उपदेश केला, तरी त्याचा उपयोग नसतो.
  • गरजवंताला अक्कल नसते- गरजेमुळे आडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.
  • घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात- एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.
  • घरोघरी मातीच्या चुली- एखाद्या बाबतीत सामान्यत: सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
  • घर ना दार देवळी बिऱ्हाड- बायकापोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती.
  • घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे- स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.
  • चोर सोडून संन्याशाला फाशी- खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
  • चोराच्या मनात चांदणे- वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय, अशी सारखी भीती वाटत असते.

मराठी म्हणी आणि अर्थ

  • चोराच्या हातची लंगोटी- ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते, त्याच्याकडून थोडेसे तरी मिळणे.
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे- प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
  • चोराच्या उलट्या बोंबा- स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
  • ज्याच्या हाती ससा तो पारधी- एकाचे कर्तुत्व, पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.
  • ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी- एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकाची वर्मी काढण्यात अर्थ नसतो; कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.
  • जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे- दुसऱ्याच्या स्थितीत आपण स्वतः जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान होते.
  • जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी- मातेकडूनच बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्वान ठरते.
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही- मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
  • ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे- एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलेच खरे करण्याचा प्रयत्न करतो.
  • ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी- जो आपल्यावर उपकार करतो, त्या उपकार कर्त्याचे उपकार स्मरून त्याचे गुणगान गावे.
  • झाकली मूठ सव्वा लाखाची- व्यंग नेहमी झाकून ठेवावे.

मराठी म्हणी आणि अर्थ mhani v tyanche arth

  • टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही- कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.
  • डोळ्यात केर आणि कानात फुंकर- रोग एका जागी तर उपचार दुसरीकडेच करणे.
  • ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला.- वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्य ही बिघडतो.
  • तोंड दाबन बुक्क्यांचा मार-एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही मोकळा न ठेवणे.
  • तेल गेले, तूप गेले , हाती राहिले धुपाटणे- फायद्याच्या दोन गोष्टी असता मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
  • तळे राखील तो पाणी चाखील- ज्याच्याकडे एखादे काम सोपवलेले असेल, तो त्यातून स्वतःचा काहीतरी फायदा करून घेणारच.
  • थेंबे थेंबे तळे साचे- दिसण्यात क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता, कालांतराने वस्तूंचा मोठा संचय होतो.
  • दुभत्या गाईच्या लाथा गोड- ज्याच्या पासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो.
  • दगडापेक्षा वीट मऊ- निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे.
  • दैव देते आणि कर्म नेते- सुदैवाने झालेला लाभ नियती प्रतिकूल असल्यामुळे आपणास उपभोगता येत नाही.
  • दुरून डोंगर साजरे – गोष्ट लांबून चांगली दिसते, परंतु जवळ गेल्यानंतर तिचे खरे स्वरूप कळते.
  • देखल्या देवा दंडवत- एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नमस्कार करणे.
  • दे माय धरणी ठाय- पुरेपुरेसे होणे किंवा तोंड लपवण्यापूरती तरी जागा शोधणे.
  • देश तसा वेश- परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.

मराठी म्हणी आणि अर्थ

  • दुष्काळात तेरावा महिना- अगोदरच्या संकटात आणखी भर
  • दृष्टी आड सृष्टी- आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.
  • नावडतीचे मीठ आळणी- आपल्या नावडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली, तरी ती आपल्याला वाईटच दिसते.
  • नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने- दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात.
  • न कर्त्याचा वार शनिवार – ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते,तो कोणत्यातरी कारणाने ते टाळतो.
  • नाचता येईना अंगण वाकडे– आपल्याला एखादे काम करता येत नसेल, तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरता संबंधित गोष्टीत दोष दाखवणे.
  • नाव मोठं लक्षण खोट- बाह्य देखावा आकर्षक, पण कृतीच्या नावाने मात्र शून्य.
  • नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा – नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे
  • नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराची मिजास अधिक होणे किंवा शक्तीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे.
  • नवी विटी नवे राज्य – सगळीच परिस्थिती नवीन असणे.
  • नव्याचे नऊ दिवस – कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
  • नाक दाबले की तोंड उघडते – एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य त्या दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी हवे ते काम करून घेता येते.
  • पाचामुखी परमेश्वर – बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे.
  • पाचही बोटे सारखी नसतात – सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्याच कर्तुत्वाची नसतात.
  • पाण्यात राहून माशाशी वैर करू नये- ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
  • पायाची वहाण पायीच बरी- नालायक माणसांचा वाजवीपेक्षा अधिक सन्मान झाला म्हणजे ती शेफारतात.
  • पालथ्या घड्यावर पाणी- केलेला उपदेश निष्फळ ठरणे.
  • पी हळद , हो गोरी – कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.
  • पळसाला पाने तीनच – सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा – दुसऱ्याचा अनुभव पाहून त्याच्यावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो.
  • पदरी पडले पवित्र झाले – कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे ठेवू नये. तिच्या बाबतीत समाधान मानावे.
  • फुल ना फुलाची पाकळी – वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे.
  • बावळी मुद्रा देवळी निद्रा – दिसण्यात बावळट, पण व्यवहारचतुर माणूस.

100 मराठी म्हणी आणि अर्थ

  • बुडत्याचा पाय खोलात – आधीच अपयश आलेल्या माणसाला सतत अपयशच येत जाते.
  • बैल गेला अन् झोपा केला – एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिच्या साठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
  • बाप तसा बेटा – बापाच्या अंगचे गुणच मुलात उतरणे.
  • बडा घर पोकळ वासा – दिसण्यास श्रीमंती ; पण प्रत्यक्षात तिचा अभाव.
  • बळी तो कान पिळी – बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो.
  • बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले- बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला सन्मानाने वागवावे.
  • बुडत्याला काडीचा आधार – घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची वाटते.
  • बोलेल तो करेल काय? – केवळ बडबड करणाऱ्यांकडून काहीही होऊ शकत नाही.
  • बाप से बेटा सवाई – वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार .
  • भित्या पाठी ब्रह्मराक्षस – भित्रा माणूस काही कारण नसतानाही भीत असतो.
  • भीक नको, पण कुत्रं आवर – एखाद्याच्या मनात नसल्यास त्याने आपल्याला मदत करू नये, परंतु निदान आपल्या कार्यात विघ्न आणू नये अशी स्थिती.
  • भुकेला कोंडा निजेला धोंडा – अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्याची माणसाची तयारी असते.
  • भरवशाच्या म्हशीला टोणगा – खूप आशा वाटणाऱ्या माणसाच्या बाबतीत संपूर्ण निराशा होणे.
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुणदोषांचे दर्शन होते.
  • मनात मांडे पदरात धोंडे – केवळ मोठ – मोठी मनोराज्ये करायची; परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती.
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तेवढा फायदा घेऊ नये.
  • यथा राजा तथा प्रजा – प्रमुख माणसाच्या आचार विचारांप्रमाणे त्याच्या अखत्यारीतील इतर माणसांचे आचार विचार असतात.
  • ये रे माझ्या मागल्या – एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरवून पुन्हा पूर्वीसारखेच वागणे.
  • रात्र थोडी सोंगे फार – कामे भरपूर असणे ; पण वेळ थोडा असणे.
  • रोज मरे त्याला कोण रडे – तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
  • लेकी बोले सुने लागे – एकाला उद्देशून; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
  • लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण – लोकांना उपदेश करायचा, पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.
  • लंकेत सोन्याच्या विटा – लांबवर असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो.
  • लाज नाही मना कोणी काही म्हणा – निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची परवा करीत नाही.
  • वराती मागून घोडे – एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते.
  • वासरात लंगडी गाय शहाणी – मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो.
  • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर – गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे.
  • शहाण्याला शब्दांचा मार – शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर येतो.
  • शितावरून भाताची परीक्षा- वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान माणसाला कशाचीही उणीव पडत नाही.
  • सुंभ जळला तरी पीळ जात नाही – हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले, तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.
  • सगळे मुसळ केरात – मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाणे.
  • हातच्या कंकणाला आरसा कशाला ? – स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
  • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे; स्वतःला झीज लागू न देणे.
  • हत्ती गेला, शेपूट राहिले – कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला.

150 मराठी म्हणी आणि अर्थ या पोस्टमध्ये देण्यात आले आहेत. आणखी काही मराठी म्हणी आणि अर्थ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *