Skip to content

रक्षाबंधन माहिती मराठी 2024 | राखी पौर्णिमा एक सण

  • by
रक्षाबंधन

श्रावण महिन्यातील पौर्णिमे दिवशी येणारा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा होय. हा सण भावा बहिणी मध्ये स्नेह, प्रेम वाढवणारा आहे. यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये रक्षाबंधन हा सण सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 दिवशी आहे. रक्षाबंधन हा सण पौर्णिमे दिवशी येत असल्याकारणाने या सणाचा दिवस व तारीख ही दरवर्षी बदलत असते.

रक्षाबंधन एक सण

भारतात निरनिराळे सण मोठया उत्साहाने साजरे केले जातात. या सणामध्ये रक्षाबंधन हा एक महत्वपूर्ण सण मानला आहे. देशभरामध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातामध्ये एक धागा बांधते. त्याला राखी असे म्हणतात. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या राखीच्या बदल्यात भावाने त्या बहिणीचे रक्षण करावे आशी या प्रकारची परंपरा आहे.

महाराष्ट्र मध्ये या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केली जाते. त्यानंतर स्वच्छ व सुंदर कपडे परिधान करून दोघेही बहीण भाऊ तयार होतात. त्यानंतर एक पाट ठेवून त्याच्या सभोवती सुंदर अशी रांगोळी काढली जाते. त्या पाटावर भावाला बहीण प्रेमाने बसवते.

त्यापूर्वी बहिण एका ताटामध्ये पणती, एखादा गोड पदार्थ, टीका लावण्यासाठी कुंकू, थोडेसे तांदूळ, एक रुपया व राखी ठेवून ओवाळणीचे ताट तयार करते. ताटातील पणतीत तेल टाकून ती पणती प्रज्वलित करतात.

सुरुवातीला बहीण भावाच्या कपाळावर टीका लावून त्यामध्ये तांदूळ चिकटवते. थोडे तांदूळ डोक्यावरही टाकले जातात. त्यानंतर पाटावर बसलेल्या भावाच्या उजव्या हातामध्ये बहीण राखी बांधते. ही राखी म्हणजे एखादा धागा किंवा आकर्षक रित्या मण्यापासून, रंगीत कागदापासून अथवा इतर साहित्यापासून तयार केलेली राखी असू शकते. त्यानंतर ओवाळणीचे ताट हातात घेऊन भावाला ओवाळते.

ओवाळून झाल्यानंतर शेवटी बहिण भावाला एखादा गोड पदार्थ (जसे पेढा, साखर, बर्फी, लाडू) भरवते. या राखीच्या बदल्यात भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. त्याचं बरोबर बहिणीसाठी एखादी सुंदर वस्तू भेट म्हणून देतो. भेट वस्तू ह्या निरनिराळ्या प्रकारच्या ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वयानुसार निरनिराळ्या असू शकतात.अशाप्रकारे अतिशय आनंदी वातावरणात या दिवसाची सुरुवात होते.

बऱ्याचदा बहिण भाऊ एकमेकांपासून दूर असल्यास त्या दवशी आवर्जून ते एकमेकाकडे जातात. एकमेकांना भेटतात. एकमेकाकडे जाणे शक्य नसल्यास या राख्या पोस्टामार्फत बहीण आपल्या भावापर्यंत पोहोचवते. त्यासाठी या सणाच्या अगोदर काही दिवस या राख्या पाठवल्या जातात.

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना या सणाचा आनंद घेता यावा, यामध्ये सामील होता यावे यासाठी देशभरातून लाखो मुली सैनिकांसाठी राख्या पाठवतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये ही आनंदाचे वातावरण निर्माण होते.

आशा या बहीण भावाच्या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणानिमित्त आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *