Skip to content

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

  • by
प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण आपण या लेखात पाहणार आहोत. २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान पूर्ण करून संविधान सभेस सुपूर्त केले.

धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, प्रजासत्ताक व स्वतंत्र भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण : संविधान महत्व

आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. त्या अगोदर भारताचे शासन 1935 च्या कायद्यावर आधारित होते व आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्या राज्यघटनेची आवश्यकता होती.

संविधान तयार करण्यासाठी संविधान समिती तयार केली. त्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती तयार करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष व घटना तज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. त्यांनी इतर सदस्यांसमवेत २ वर्ष ११ महिने १८ दिवस या कालावधीत दिवस रात्र कष्ट करून भारतीय राज्यघटना तयार केली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधान स्विकारले. २४ जानेवारी १९५० रोजी सभेचे शेवटची सभा झाली व त्यावेळी चर्चा व सुधारणा करून ३०८  सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि २६  जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान देशासाठी लागू केले गेले.

अशाप्रकारे या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

संविधानाने आपल्याला आर्थिक, सामाजिक व राजनैतिक न्यायाची हमी दिली आहे. संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देशसाठी निर्माण केलेल्या संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे मूल्यांचे आचरण करणे. म्हणजे निस्वार्थीपणे कर्तव्ये व जबाबदारी पार पडणे होय.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण : राजधानीत संचलन

भारताची राजधानी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आपला देश इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना पाहुणे म्हणून आमंत्रित करतो. या आलेल्या पाहुण्यांच्या सोबत राष्ट्रपतींचेही आगमन होते. पंतप्रधान देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात.

ध्वजारोहण करून 21 तोफांची सलामी दिली जाते व देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना निरनिराळे पुरस्कार दिले जातात. तसेच भारतीय हवाई सेना, पायदळ आपापल्या सर्व शस्त्रांसोबत मानवंदना देतात वायुसेना आपली युद्ध विमाने घेऊन प्रात्यक्षिके दाखवतात.

चित्ररथ हे या सोहळ्यातील खास आकर्षण असते. भारतामधील सर्व राज्यातून चित्ररथाचे आयोजन केले जाते. याच्या सादरीकरणासाठी अगोदर पासून तयारी केलेली असते. चित्ररथा मध्ये राज्यातील संस्कृतीचे दर्शन  केले जाते. प्रभावशाली चित्ररथाला विशेष पारितोषिक दिले जाते

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण : शाळेचा सहभाग

प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये लेखन, वाचन, वक्तृत्व तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. प्राथमिक शाळा सकाळी ढोल-ताशांच्या गजरात भारत मातेच्या जयघोषात प्रभात फेरी काढतात. शाळेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व ध्वजारोहण होते भाषणे होतात. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होतो. हस्तांदोलन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम होतो. लहान मुलांना खाऊ दिला जातो.

भाषणात आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती वर्षे कष्ट सोसावे लागले, इंग्रजांनी केलेला अन्याय व आपल्या क्रांतिवीरांचे योगदान याबद्दल सांगितले जाते. यामुळे मुलांच्या मनात राष्ट्राप्रती प्रेम, आदर व राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण : देशाप्रती आपली कर्तव्ये

26 जानेवारी 1950 म्हणजेच प्रजासत्ताक दिन या दिवसापासून आपल्या जनतेच्या हातात खऱ्या अर्थाने सत्ता, हक्क प्राप्त झाले. आपण हक्क व अधिकाराबाबत जागरूक व आग्रही असताना आपली देशाप्रती काही कर्तव्ये निर्माण होतात. हेही महत्त्वाचे आहे.आपण आपल्या प्रियजनांवर जसे आदर आणि प्रेम करतो. तसेच आपल्या राष्ट्राबद्दल असायला हवे. आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा या हेतूने समाजात शांतता व सुव्यवस्था राखली पाहिजे.

आपल्या आजी – माजी सैनिकांचा मान राखला पाहिजे. शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक ठिकाणी आयोजित प्रजासत्ताक दिनास आपण स्वतः आवर्जून हजर राहिले पाहिजे. आपल्या आप्तेष्टांना व मित्र मंडळींना शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

कायद्याचे पालन करायला हवे जात धर्म वर्ण व मतभेद सर्व विसरून देशाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे टिकवून देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान असायला पाहिजे आणि आणीबाणीच्या काळात देशाला आपला हातभार लागायला हवा. आपले कर वेळेवर भरून आपली कर्तव्य पार पाडायला हवी. तसेच आपल्यामुळे समाजातील लोकांना त्रास होणार नाही याची ही काळजी घ्यायला हवी.

आपल्या संस्कृतीचे जतन करणे. वने, सरोवर, नद्या, वन्यजीव व नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि सजीव प्राण्यांवर दया करणे . वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. हे आपले कर्तव्य आहे.

जय हिंद! जय भारत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *